नदाफसह टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी

 
इचलकरंजी, येथील गावभाग परिसरात दहशत माजवणारा रेकॉर्डवरील सलमान नदाफ (Nadaf) आणि त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्हे दाखल होऊनही या टोळीचा भागात मोठा उपद्रव असून नागरीकांत भितीचे वातावरण आहे. महिलेवर हल्लाप्रकरणी सलमान नदाफ याच्यासह ५ जणांना अटक केली असून ते जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा नागरीकांना त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधिक्षक आण्णासाहेब जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात, सलमान नदाफ, अविनाश पडीयार, अरसलान सय्यद, अनिकेत पवार, यश भिसे यांच्यासह त्यांची टोळी दहशत माजवून नागरीकांना त्रास देत असते. या टोळीवर खून, खुनी हल्ला, धमकावणे, खंडणी गोळा करणे, परप्रांतियांकडुन हप्ते गोळा करणे यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा म्होरक्या सलमान राजू नदाफ यांच्यासह साथीदारांकडुन गुटखा तस्करी तसेच जुगार क्लब चालवणे, हप्ता गोळा करणे, गांजासारखे अंमली पदार्थ शहर परिसरात विक्री करणे तसेच भागातील अल्पवयीन मुलांना टोळीत सामावून घेऊन त्यांच्याकडुन गंभीर गुन्हे घडवून आणणे, मुलांना व्यसनाधीन बनविने, या टोळीवर विविध ३ गुन्हे दाखल असून चिक्कोडी (कर्नाटक) पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. या टोळीचे आंतरराज्य कनेक्शन आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली असली तरी कारागृहातून सुटल्यानंतर ते दहशत निर्माण करून पुन्हा नागरीकांना त्रास देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे सलमान नदाफ याच्यासह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी निवेदनात केली आहे. नागरीकांच्या स्वाक्षरींचे हे निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक जाधव यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, प्रशांत कुलकर्णी, किशोर निंबाळकर, संग्राम लोंढे, सागर पाटील, अशिष पाटील, किरण लंगोटे, सुनिल लंगोटे यांच्यासह भागातील नागरीकांचा समावेश होता.