परस्पर मुरूम उचलल्याने वाद; नागरिकांत संताप

हातकणंगले,जुन्या कोल्हापूर- विजापूर मार्गावरील हातकणंगले ग्रामीण रुग्णालयांला लागूनच असलेल्या नगरपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यावरील लाखो रुपये किमतीच्या सुमारे २५० ब्रास मुरूम परस्पर उचलून तो खाजगी मालकीतील हद्दीत टाकल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.याबाबत परिसरांतीलनागरिकांनी एकत्र येऊन संबंधित जागा मालकाला जाब विचारला असता अधिकारी आमच्या खिशांत आहेत, तुम्हांला काय करायचे ते करा अशी अरेरावीची भाषा वापरल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यावर त्यांनी नायब तहसिलदार, सर्कल अधिकारी, तलाठी यांना बोलावून घेतले. संबंधितांनी सर्व साहित्य ताब्यांत घेऊन पंचनामा केला आहे.

 हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील गट नंबर २१८ मध्ये काही प्लॉट पाडले आहेत. या प्लॉटमध्ये लागून असलेल्या नगरपंचायतीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मुरूम उचलून, तो सदर प्लॉट मध्ये खाजगी व्यक्तीने त्याच्या खाजगी मालकीतील रस्त्यावर टाकला आहे. या कामासाठी शेकडो ट्रॅक्टर मुरूम वापरल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी नगरपंचायती च्या हद्दीतून मुरूम उचलण्याची परवानगी त्यांना कोणी दिली होती का?. सदर मुरूम कोणत्या ठिकाणाहून उचलण्यात आला ? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. त्यावर संबंधितानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाद वाढत गेला. संबंधित ठिकाणचा पंचनामा केला असून उद्या त्यांना रितसर नोटीस पाठवली जाईल. अशा प्रकारे पूर्व परवानगी शिवाय मुरूम उचलणे चुकीचे आहे. त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.