इचलकरंजी, विद्यार्थीनी, युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटीबद्ध असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी निर्भया पथक २४ तास कार्यरत आहे. विद्यार्थीनी, युवती आणि महिलांनी निर्भयपणे १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सक्षम तु अभियान अंतर्गत रुपाली चाकणकर यांनी विद्यार्थीनी व महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थी, महिलांना मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, सध्या सायबर गुन्हेगारी वाढत आहे. सोशल मिडीयावरून मैत्री वाढवत मुली, महिलांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तिची मैत्री तात्काळ स्विकारु नका, कोणत्याही भुलथापांना बळी पडु नका. निर्भया पथक ही तुमची दुसरी आई आहे. तुम्हाला कोणी त्रास देत असेल, छेड काढत असेल, पाठलाग करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा. आई- वडील, शिक्षक यांच्याशी कायम संवाद ठेवत जा, असेही सांगितले. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थीनींच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षण संस्थांना केले. यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी, निर्भया पथकाचे काम चित्रिफतीद्वारे दाखवून विविध उदाहरणासह प्रात्यक्षिकेही सादर केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शितल फराकटे, शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, माजी आमदार अशोकराव जांभळे, अमित गाताडे, लतिफ गैबान, परवेज गैबान, नासीर अपराध यांच्यासह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थीनी, युवती, महिला उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖
📣इचलकरंजी मधल्या मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा.. !!!
➖➖➖➖➖➖➖
