ट्रम्प यांच्या निर्णयानंतर 25% Tariff मुळं भारताच्या ‘या’ वस्तूंवर थेट परिणाम

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येताच डोनाल्ड ट्रम्प अनेक असे निर्णय घेणार ज्याचे थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येतील असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता आणि तसंच झालं. आयात शुल्काच्या मुद्द्यावरून जगातील अनेक देशांना अमेरिकेनं घाम फोडलेला असतानाच भारतालाही दणका दिला आहे. भारतावर अमेरिकेनं 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा करत रशियाकडून तेल आणि लष्करी सामग्रीच्या खरेदीवरही पेनल्टडी लागू केली आहे. 1 ऑगस्टच्या ‘डेडलाईन’पूर्वीच ट्रम्प (Trump) यांनी ही घोषणा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश 2021 पासून ‘ट्रेडिंग पार्टनर’ असून 2024-25 दरम्यान या दोन्ही देशांचा व्यापार साधारण 186 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. यामध्ये भारताचा आयात वाटा 86.5 अब्ज डॉलर आणि अमेरिकेचा वाटा होता 45.3 अब्ज डॉलर. भारतानं व्हिस्की, मोटरसायकर अशा वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली असली तरीही अमेरिकेनं मात्र याविरोधातच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

स्मार्टफोन- भारतातून अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात निर्यात केली जाणारी वस्तू आहे स्मार्टफोन. Apple च्या मॉडेलचीसुद्धा आता भारतातच निर्मिती होत असल्या कारणानं भारतानं आयफोन निर्यातीत चीनलाही मागे टकलं आहे. 2025 मध्ये भारतानं अमेरिकेत 24.1 बिलियन डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 55 टक्के अधिक असला तरीही आता त्यावरच आयात शुल्काच्या निर्णयाचा जबर फटका बसणार आहे.

औषधं – भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची उत्पादनं आहेत फार्मास्यूटिकल अर्थात औषधं. सर्वसामान्य औषधांसमवेत भारतातून इतरही काही संबंधित औषधांची निर्यात केली जाते. 2025 मध्ये हा निर्यातीचा आकडा 10 बिलियन डॉलर इतका असून, भारतातील एकूण औषध उत्पादनांपैकी निर्यातीचा हा आकडा 31-35 टक्के इतका आहे. त्यामुळं करसवलत नाही मिळाली तर आयात शुल्कामुळं अमेरिकेत भारतीय उत्पादनांची किंमत वाढू शकते.

कापड- तिसऱ्या क्रमांकावरील निर्यात उत्पादन आहे कापड. भारतानं 2025 मध्ये अमेरिकेत जवळपास 10.8 बिलियन डॉलरचे ‘अपेरल क्लॉथ’ निर्यात केले असून, या बाबतीत अमेरिका मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. सध्या अमेरिकेकडून भारतीय कापड उत्पादनांवर 10 ते 12 टक्के आयात शुल्क आकारला जातो. मात्र हा आकडा वाढून 25 टक्क्यांचा नियम लागू केल्यास भारतीय कापड उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे.

ऑटो पार्ट- गतवर्षात भारतानं साधारण 2.2 बिलियन डॉलर इतक्या किमचीचे वाहनांसाठीचे विविध भाग अर्थात ऑटो पार्ट आणि तत्सम गोष्टींची निर्यात केली. मात्र ट्रम्प यांच्या 25 टक्के आयात शुल्काच्या निर्णयामुळं भारतातील इंजिनिअरिंग गुड्स क्षेत्रावरही परिणाम पडताना दिसू शकतो.