आटपाडी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांना सक्त सूचना

आटपाडी , तालुक्यातील प्राथमिक शाळेसंदर्भात निकृष्ट शालेय पोषण आहार, बेजबाबदार शिक्षक , घटत चाललेली विद्यार्थी पटसंख्या , शिक्षकांचे राजकीय वर्तन, आयकार्ड न घालणे या संदर्भात लोकशाही दिनात बसपाचे आटपाडी-खानापूर विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तातडीने आटपाडी गटशिक्षणाधिकारी यांनी यासंदर्भात मुख्याध्यापकांना सक्त सूचना दिल्याची माहिती हेगडे यांनी दिली. हा लोकशाही दिनाचा कार्यक्रम तहसील `कार्यालयाच्या मुख्य सभागृहात झाला.

या संदर्भात हेगडे म्हणतात, प्राथमिक शाळेमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेळापत्रकानुसार शासनाच्या पाककृती अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या असताना सुद्धा आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शाळेमध्ये फक्त मसाले भात शिजवून दिला जातो. अन्नधान्य बाबतीत आणि स्वयंपाकावेळी योग्य ती काळजी न घेण्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. शिक्षकांच्या संघटना त्यांचे वाढलेले राजकीय संबंध यामुळे या शिक्षकांचे लक्ष शाळेपेक्षा राजकीय कार्यक्रमामध्येच असते.अशा शिक्षकांवर वेळीच अंकुश ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी राजकीय संबंध ठेवणे, तसेच राजकीय पक्ष्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे, निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्ष्याच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय होणे प्रतिबंधित आहे.