राज्याच्या राजकारणाला कलाटणी ? राज ठाकरे महाविकास आघाडीत ?

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात महाविकास आघाडीमधील सर्वच दिग्गज नेत्यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत. राज ठाकरेंबरोबरच शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. या सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिल्याने ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील युतीची नांदी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरे जुलै महिन्यामध्ये दोन वेळा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले होते. आता ते थेट महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम नव्या युतीची नांदी आहे याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरेंबरोबर जवळीक वाढल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव आगामी निवडणुकीमध्ये एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आता उद्धव राज ठाकरेंसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत राहाणार हा प्रश्न कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने राज ठाकरेंच्या भाषिक भूमिकाला आपलं समर्थन नसल्याचं या आधीच जाहीर केलं आहे. मात्र आता काँग्रेस राज यांना भविष्यात महाविकास आघाडीत स्थान देणार की ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला तरी ठाकरे एकत्र लढतील असाही एक मतप्रवाह आहे.

राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या सोहळ्याला पोहोचले तेव्हा मंचावर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच खासदार संजय राऊतांच्या बाजूला बसले होते. राऊत आणि राज यांनी आधी हस्तांदोलन केलं. त्यानंतर दोघेही बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यावरील प्रेमापोटी आपण इथे आलो आहोत, असं राज ठाकरेंनी सांगितलं. हिंदी भाषिक वादाबरोबरच राज यांनी जमिनी न विकण्याचं आवाहन स्थानिकांना केलं.