‘ सिंदूर महारक्तदान ‘ साठी नऊ हजारांवर रक्तदाते

विटा, सिंदूर महारक्तदान यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल ९हजाराहून अधिक रक्तदात्यांची नोंदणी झाली आहे. यातील एक हजार दोनशे जणांनाच पहिल्या
टप्प्यात प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभागी होता येईल, येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी सांगलीतून ही यात्रा जम्मू काश्मीरकडे रवाना होत आहे, अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली आहे.

सीमेवरच्या जवानांसाठी रक्त संकलन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातून एक हजार जणांची ‘ सिंदूर महारक्तदान यात्रा ‘ सांगलीतून रवाना होणार आहे. सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने ही महारक्तदान यात्रा आयोजित केली आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले, ही यात्रा शिवसेनेच्या पुढाकाराने जम्मू आणि काश्मीर , उधमपूर या ठिकाणच्या लष्करी रुग्णालयांकडे जाणार आहे. तिथे जाण्यासाठी सांगलीहून स्वतंत्र २२ डबे असलेली ‘ धर्मवीर एक्सप्रेस ‘ रेल्वे बुक केली आहे. पाच ऑगस्ट रोजी मंगळवारी सांगलीतून ही रेल्वे निघणार आहे.

सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने क्रांतिदिनीं शनिवारी ९ ऑगस्टला जम्मू काश्मीरच्या आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा रक्तदान कार्यक्रम होईल. ५ ऑगस्ट रोजी सांगलीहून एक हजार तरुण रक्तदानासाठी निघतील २०० स्वंसेवक नेमण्यात आहेत. ही यात्रा ७ ऑगस्टला जम्मू आणि उधमपूर येथे पोहोचेल . तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री , अन्य मंत्री या यात्रेचे स्वागत करणार आहेत.

त्यानंतर निवडक २०० जणांना सोबत घेत विशेष विमानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीनगरमध्ये जाऊन तेथील आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान होणार आहे.