इचलकरंजी, वस्त्रनगरीला एक्स्पोर्ट सिटी करण्याचा मानस आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत आवश्यक त्या सुविधा आणि मार्गदर्शन कारखानदारांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वार्षिक सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन चंद्रकांत पाटील होते.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले की, वस्त्रोद्योगाची प्रगती व्हावी, कारखानदार मोठा व्हावा यासाठी आपण शासनाच्या विविध योजना आणतो. त्या योजनांचा लाभ कारखानदारांनी योग्य पद्धतीने घ्यावा. त्यामध्ये भानगडी करण्याचा प्रकार करू नये.
सध्या मंदीचा काळ असतानाही साध्या आणि ऑटोलूम धारकांना मिळणारी मजुरी पाहता तेजी असल्याचे दिसते. मजुरी खाली आणण्यास कारखानदार स्वतः जबाबदार आहेत. तेव्हा मजुरीबाबत स्पर्धा न करता कारखानदारांनी दर्जेदार उत्पादनासाठी स्पर्धा करण्याची गरज आहे.
उद्योजकांना भेडसावणारा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी सोलर योजना आणली जाणार आहे. त्यामुळे आगामी वीस वर्षे किमान एकच वीजदर राहील, अशी ग्वाही आवाडे यांनी शेवटी दिली.
चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच केंद्र शासनाने टफ योजना पूर्ववत सुरू करावी, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, सोलर ऊर्जा योजना अंमलात आणावी, महिलांना डीकेटीई आणि बिट्रा या संस्थेतर्फे वस्त्रोद्योगाचे प्रशिक्षण देण्याचे सुविधा निर्माण करावी, अशी मागणी केली.
प्रारंभी व्हा. चेअरमन रफिक खानापुरे यांनी स्वागत केले. सेक्रेटरी एस. डी. जोशी यांनी नोटीस व विषय वाचन केले. उपस्थित सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.
याप्रसंगी तेजस्विनी करजगार हिचा सत्कार करण्यात आला. शेवटी संचालक पांडुरंग सोलगे यांनी आभार मानले. सभेस सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित कारखानदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
