हातकणंगले ता नांदणी येथील १२०० वर्षांची परंपरा लाभलेल्या मठातील माधुरी नावाची हत्तीण, न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात स्थलांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन देऊन या प्रकरणात पक्षाची सर्व ताकद उभी करण्याची मागणी केली आहे.
पेटा (पीईटीए ) या संस्थेने न्यायालयात दिलेली माहिती ही अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे. माधुरी हत्तीण ही केवळ प्राणी नसून, लाखो लोकांच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि अध्यात्मिक नात्याचा भाग आहे. तिचे स्थानांतर ही फक्त कायदेशीर बाब नसून भावनिक संवेदनेचा विषय आहे.
या अगोदरही कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील सुंदर नावाचा हत्ती नेण्यात आला होता आणि आता शेडबाळ मंदिरालाही हत्तीसंदर्भात नोटीस आल्याचे समजते. या घटनांची साखळी सुरू राहिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील मठ-मंदिरांची परंपरा धोक्यात येईल, असे मत जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी व्यक्त केले.
निवेदन देते वेळी खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, अरुणभाई दुधवडकर, वैभव उगळे, रविकिरण इंगवले, प्रा. सुनील शिंत्रे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.
