राजाराम स्टेडिअम गाळ्यात सोयी-सुविधांचा अभाव

इचलकरंजी,  शहरातील सर्वात मोठे व्यापारी संकूल म्हणून राजाराम स्टेडिअम ओळखले जाते. त्या परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी कोणतीही प्राथमिक सुविधा, शौचालय नाही. त्यामुळे गाळेधारकांसह येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. याबरोबर या परिसरात भिकारी, फिरस्ते यांचे मोठे प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी वाढली आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेत नसल्याने महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

 शहराच्या विविध भागामध्ये तत्कालीन नगरपालिकेच्या माध्यमातून व्यवसाय – व्यापारासाठी गाळे बांधण्यात आले आहे. या गाळ्यामध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय व्यापार करीत आहे. स्टेडिअमच्या गाळ्यात व्यापारी, मुद्रांक विक्रेते, सरकारी व निम सरकारी कार्यालये, सहा. कामगार आयुक्त कार्यालय दस्त नोंदणी कार्यालय, टेक्सस्टाईल आयुक्त कार्यालय यासह विविध साहित्य, कपड्याचीही दुकाने आहेत. त्यामुळे या परिसरात कायमपणे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

 येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसह, ग्राहक गाळाधारकांना शौचालयाची सुविधा असावी म्हणून ‘पे अॅन्ड यूज’ शौचालय सुरू केले होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे विविध समस्यांना तोंड घ्यावे लागत आहे. सायकाळनंतर लघुशंका कोठेही करताना दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत आहे.

 तसेच सांयकाळनंतर राजाराम स्टेडिअम परिसरात भिकारी व फिरस्ते यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. तसेच काही मद्यपी मंडळी या परिसराचा ‘ओपन बार’ म्हणून वापर करीत आहे. त्यामुळे अनेकवेळा वादावादीचे, मारामारीचे प्रकार घडले आहेत.

 गाळा परिसरात शौचालयाची सुविधा करून द्यावी अशी मागणी येथील गाळाधारकांनी वेळच्या वेळी केली आहे.मात्र, महानगरपालिका प्रशासन कोणतेही लक्ष देत नसल्याने महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करणेत येत आहे. तेव्हा आयुक्त पल्लवी पाटील यांनी याबाबत तातडीने लक्ष देवून सोयी -सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.

 कोट्यवधी रूपये खर्च करून शहरातील विविध भागामध्ये दुकान गाळे उभारण्यात आले आहेत. अनेक दुकान गाळ्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. तसेच शॉपींग सेंटर, थोरात चौक, पंचवटी टॉकीज परिसर, कॉ. के. एल. मलाबादे चौक या ठिकाणी असलेल्या शॉपींग सेंटर परिसरात कोणतीही प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याने येणाऱ्या नागरीकांना गाळेधारकांची मोठी गैरसोय होत आहे.
महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत उदासिनता विविध गाळ्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेला कोट्यवधीचे उत्पन्न मिळते. मात्र, बऱ्याचश्या गाळ्यामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याचे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृहाची उभारणी केल्याची दिसून येत नाही. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांच्या स्वच्छतागृह उभारण्याबाबत महानगरपालिका प्रशासनच्या उदासीन धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.