पावसाळ्यात दरवर्षी सांगोला (Sangola) शहरातील धोकादायक इमारतींना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावली जाते. यंदाही मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या बांधकाम विभागाने शहर व उपनगरातील जीर्ण व मुडकळीस आलेल्या धोकादायक आशा ३६ इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित धोकादायक इमारत मालकांना नोटीसा बजावणीच्या प्रक्रिया सुरु आल्याची माहिती सांगोला नगरपरिषद बांधकाम विभागाने दिली आहे.
मागील काही वर्षांपासून काही धोकादायक इमारती मोडकळीस आलेल्या असतानाही त्यांची केवळ दुरुस्ती करून वापर सुरु आहे. यामुळे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्यांसह आजूबाजूच्या घरातील नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो आहे. याबाबत संबंधित इमारत धारकांना वेळोवेळी पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावणी करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात धोकादायक इमारतींची संख्या ५६ आहे. रस्त्यास कडेस धोकादायक इमारत असल्यास रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे जीवितास कोणताही धोका पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी . तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांना याचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित इमारत मालकांना देण्यात आल्या आहेत.
