विटा, येथील अॅड. विशाल कुंभार यांच्या घरातून जप्त केलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर पोलिसांनी कोणत्याही पद्धतीची छेडछाड (tampering)न करता बुधवारी १३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सादर करावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असल्याची माहिती अॅड. विजय जाधव यांनी दिली आहे.
विटा येथील अॅड. विशाल कुंभार यांना २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री विटा पोलिसांच्या पथकाने घरातून उचलून त्यांना फरफटत पोलीस ठाण्यात नेले होते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. या प्रकारानंतर विट्यासह सांगली जिल्ह्यातील वकील संघटना चांगलीच आक्रमक झाली होती. वकील संघटनांनी सांगली जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांची भेट घेऊन याबाबत कारवाईची मागणी केली होती.तसेच याप्रकरणी विटा शहरात वकील संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. परंतु या प्रकरणी कोणत्याही पद्धतीची कारवाई न झाल्यामुळे विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. विजय जाधव, माजी अध्यक्ष अॅड. सचिन जाधव, सचिव अॅड. सुखदेव कुंभार यांच्यासह सांगलीचे अॅड. प्रमोद सुतार, अॅड. संजय देसाई, अँड. संतोष जाधव, अॅड. विशाल कुंभार यांच्यासह वकिलांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.
कायदेतज्ञ अॅड. उज्वल निकम यांचे सुपुत्र अॅड. अनिकेत निकम आणि अॅड. सुदत्त पाटील यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात अॅड. विशाल कुंभार यांच्यावतीने याचिका दाखल केली. यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती अनखड यांनी विटा पोलिसांच्या या कारवाईबाबत गंभीर दखल घेत अॅड. विशाल कुंभार यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर पोलिसांनी कोणत्याही पद्धतीची छेडछाड न करता उद्या बुधवारी १३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सादर करावेत, असा आदेश दिला आहे.
