रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका

रायगडमधला (Raigad) शिवसेना, राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहोचलाय. महायुतीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला संघर्ष दिवसांगणिक वाढतच चालला आहे. रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले वादाचा आता नवा अंक समोर आला आहे. सुनील तटकरे यांची आता उलटीगिनती सुरू झालीय, असा जाहीर इशारा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत आम्ही मुक्तहस्ते मदत केल्यानंच तटकरे खासदार झाल्याचा दावा गोगावले यांनी केलाय. तर कुणालाही उत्तर द्यायला मी बांधील नाही म्हणत तटकरे यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय.

पालकमंत्रीपदावरून गोगावले विरुद्ध तटकरे सामना रंगलेला असतानाच शिवसेनेनं मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. माध्यमांना काहीतरी देण्यासाठी दोन्ही नेते बोलत असल्याचा टोला शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंतांनी लगावला. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. पालकमंत्रीपदाकडे आस लावून बसलेल्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधीही नाकारण्यात आली. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी आधीच आग्रही असलेल्या शिवसेनेत नाराजी वाढलीय. यावरूनच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पालकमंत्रिपद म्हणजे तटकरे यांच्यासाठी सत्तेचा मलिदा असल्याची टीका थोरवेंनी केलीय.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौ-यादरम्यान तटकरे आणि शिंदे यांची भेट झाली होती. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा दिल्लीत सुटल्याची चर्चा होती. दिल्ली दरबारी रायगडचा तह झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. तटकरे विरुद्ध गोगावले वाद शिगेला पोहोचलाय. दुसरीकडे पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावरूनही राजकीय समीकरणं ठरण्याची शक्यता आहे.