राज्यातील धरणांत 75 टक्के पाणीसाठा

राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा एकूण २,९९७ इतक्या धरणांमध्ये (Dams) यावर्षी १५ ऑगस्टअखेर सुमारे ७५.७१ टक्के म्हणजेच १०८३.७८ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ८ टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यात सर्वात जास्त ८७.६५ टक्के पाणीसाठा कोकण विभागात आणि त्या खालोखाल ८४.४९ टक्के पुणे विभागात असून, सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागात (६५.४८ टक्के) असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख २५ धरणांमधील उपयुक्त पाण्यासाठ्याची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी असून, ती गतवर्षीपेक्षा ११ टक्क्यांनी जास्त असल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे. जलसिंचनतज्ज्ञ इंजिनिअर हरिश्चंद्र चकोर यांनी ही माहिती दिली.यावर्षी मे ते १५ ऑगस्टपर्यंत पडलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये निश्चितच चांगला पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सद्यस्थितीत पावसाने उघडीप घेतली असली, तरी निश्चितपणे अजूनही एक ते दीड महिना पावसाळ्याचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश धरणे जवळपास १०० टक्के भरतील, असा अंदाज जलअभ्यासक चकोर यांनी व्यक्त केला आहे.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच धरणांमध्ये सुमारे १६.७६ टीएमसी (९४.२९ टक्के), ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे ११.८० टीएमसी (९९.४१ टक्के ) इतका पाणीसाठा आहे. नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे ९.९९ टीएमसी म्हणजेच सरासरी (८६.०६ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

या पावसाळ्यात राज्यात सर्वाधिक ५,०७० मिमी पाऊस घाट माथ्यावर मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला, तर सर्वात कमी पावसाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील लोणी (९५ मिमी) येथे झाली आहे.

जायकवाडी धरणामध्ये ९७.७९ टीएमसी म्हणजेच ९४.७० टक्के इतका एकूण पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण संचय पातळी नियमन सूचीनुसार जायकवाडी धरणामधून सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात सोडावे लागणार आहे. आतापर्यंत धरणात यावर्षीचा पावसाळ्यामध्ये एकूण ५६.६० टीएमसी इतकी आवक झाली असून, २.०१४५ टीएमसी पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.