स्वातंत्र्यदिनी कुंभोज ग्रा.प.समोर आत्मदहनाचा प्रयत्न

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे गायरान गट क्रमांक १४२०, १७१९, १७२६, १७२२ या ठिकाणी सुरू असलेला सौर ऊर्जा प्रकल्प इतर जागी स्थलांतरित करण्यात यावा सदर जागा कुंभोज गावच्या क्रीडांगण व ऑक्सिजन पार्कसाठी आरक्षित ठेवावी या मागणी करता कुंभोज मधील काही युवकांनी आंदोलन उभा केले होते.  

यामध्ये लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देणे, लाक्षणिक उपोषण करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करणे अशा विविध मार्गातून सदर प्रकल्प स्थगित करा अथवा इतर ठिकाणी स्थलांतरित करावा यासाठी कुंभोज मधील काही तरुणांनी शर्तीचे प्रयत्न केले. यामध्ये विश्वजीत माने व अरुण जमणे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परंतु ता. १२ जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात सदर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

सदर काम बंद करावे अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्यात येईल अशा आशयाचे पत्र हातकणंगले पोलीसांसह, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. १४ ऑगस्ट रोजी आंदोलनकर्ते अरुण जमणे यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी विश्वजीत माने हा फरार झाला होता. स्वातंत्र्यदिनी सकाळी नवीन ग्रामपंचायत कार्यालय येथे झेंडावंदन झाल्यानंतर विश्वजीत यांनी अंगावर पेट्रोलचे कॅन ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा केला. यावेळी उपस्थित गटनेते किरण माळी, पोलीस पाटील महंमद पठाण, तंटामुक्त अध्यक्ष बाळासो डोणे, ग्रा. प. कर्मचारी राहुल कांबळे, अमर पोवार यांनी वेळीच सावध भूमिका घेऊन विश्वजीत माने याला आत्मदहनापासून परावृत्त केले. सदर घटनेनंतर हातकणंगले पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले. विश्वजीत माने यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर पेट्रोलचे कॅन व माने यांना ताब्यात घेऊन त्यांना हातकणंगले पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आले. न्यायालयीन मार्गाने लढाई लढा, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणतेही काम करू नका. अशा सूचना दिल्या व त्यांना सोडण्यात आले. स्वातंत्र्यदिनी मला न्याय मिळाला नाही, परंतु २१ तारखेपर्यंत सदर जागेचा योग्य तो पाठपुरावा करा अन्यथा २१ तारखेला पुन्हा सदर ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार असा इशारा विश्वजीत माने यांनी दिला.