बलवडी (ता. खानापूर) येथील घरफोडीच्या घटनेचा अवघ्या नऊ तासात तपास करत पोलिसांनी शहाजी नंदकुमार मंडले (वय ३१ रा. अग्रणी मळा खानापुर) आणि नितीन मल्हारी ठोंबरे (वय ३० रा. चोपडेवाडी – खानापुर) या दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच या आरोपींकडून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बलवडी येथील शांताबाई दिनकर जाधव (वय ५० यांचे रविवारी दुपारी घर फोडून तब्बल ९ लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घरफोडी मधील चोरीस गेलेला मुद्देमाल हा विक्री करण्यासाठी दोन इसम भिवघाट येथील मुलाणी नाष्टा सेंटर जवळ थांबले असल्याची गोपनीय माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सोने व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळुन आली. तसेच अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर दागिने बलवडी येथील घरातुन चोरले असल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी शहाजी नंदकुमार मंडले (वय ३१ रा. अग्रणी मळा खानापुर) आणि नितीन मल्हारी ठोंबरे (वय ३० रा.चोपडेवाडी – खानापुर ) या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.विटा पोलिसांनी अवघ्या नऊ तासातच घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे कौतुक परिसरातून होत आहे.
