पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक सुरक्षिततेअभावी पुन्हा एकदा चार कामगारांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 वर असलेल्या मेडली फार्मास्युटिकल या कंपनीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायू गळती (Gas leak) झाल्याची घटना समोर आली आहे. नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये वायु गळती झाली असून यात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला झाला आहे, तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार या जखमी कामगारांवर सध्या बोईसरमधील शिंदे या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एल बेंडोझोल नामक औषधाचं उत्पादन करणाऱ्या या कारखान्यात तीन वाजणाच्या सुमारास वायू गळती झाली असून, या वायुगळतीची बाधा आठ कामगारांना झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यानंतर चार कामगारांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला असून चार कामगारांवर उपचार सुरू करण्यात आले.
कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृतांची नावं असून रोहन शिंदे, निलेश हाडळ या दोन गंभीर जखमी कामगारांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत . दरम्यान, बोईसर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बोईसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
