महाराष्ट्राला आता आणखी एक वंदे भारत (Vande Bharat) एक्स्प्रेस मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड-मुंबई आणि पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्राला मिळणार असून मुंबईतून सुरू होणार आहे. आता मुंबई-लातूर ही दोन शहरे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडली जाणार आहेत. त्यामुळे लातूरकरांना मुंबई गाठणे अधिक सोयीचे होईल.
लातूर हे इतिहास, संस्कृती, आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम असलेले ठिकाण आहे. लातूर येथे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, विराट हनुमान मंदिर, सूरत शहवली दर्गा अशी धार्मिकस्थळे आहेत. यासह उदगीर किल्ला, औसा किल्ला, खरोजा लेण्या आणि गंज गोलाई बाजारपेठ आहे. तसेच देशातील सोयाबीनचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र लातूर येथे आहे. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्र म्हणून लातूर प्रसिद्ध आहे.
हे. मुंबई आणि लातूर ही दोन शहरे एकमेकांना जोडण्यासाठी लातूरमधील लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून मागणी केली जात होती. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई- लातूर वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्यास मंजुरी मिळाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं लातूर आणि धाराशिव ही दोन शहरे आता पुणे आणि मुंबईला जोडण्यात येणार आहे. त्यामुळं लातूर आणि धाराशिवकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या मुंबई ते लातूर हा 525 किमीचे अंतर आहे. रस्तेमार्ग हे अंतर कापण्यासाठी 11 ते 12 तासांचा वेळ लागतो. तर एक्स्प्रेसनेही जवळपास 9.30 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळं हे अंतर 7 ते 7.30 तासांवर येणार आहे. मुंबई-लातूर एक्स्प्रेस सीएसएमटीवरुन सकाळी 6 वाजता सुटेल आणि लातूरला दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत पोहोचेल. वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी, धाराशिव आणि लातूर या स्थानकांवर थांबेल.
