कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय मामा भरणे (Dattatreya Bharane) यांनी पुण्यातील शिवाजीनगर शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या राहणीमानाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. जेवण, स्वच्छता आणि सुविधा या विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या त्यांनी नोंदवल्या.संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्वरित दूर करण्यावर भर देण्यात आली. वसतिगृहातील सुरक्षा आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था सुधारण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच स्वच्छतेसाठी नियमित देखरेख करण्यावरही त्यांनी भर दिला.
अभ्यासासाठी आवश्यक सुविधा, ग्रंथालय आणि प्रकाशव्यवस्था सुधारण्याचे आदेशही कृषी मंत्र्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन शासन पातळीवर अधिक सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाईल. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणतीही तडजोड होणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले. भविष्यात अशा अचानक भेटी घेतल्या जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित शासनापर्यंत पोहोचतील. हे विद्यार्थी वसतिगृहातील व्यवस्थापनेला अधिक जबाबदार ठरेल. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले. शासन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नेहमीच तत्पर आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
