आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बीसीसीआयने (BCCI) मोठी हालचाल केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वरिष्ठ पुरुष निवड समितीतील दोन पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर महिला संघ आणि ज्युनियर पुरुष निवड समितीतील रिक्त जागांसाठी देखील अर्ज मागवण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, वरिष्ठ पुरुष निवड समिती टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅट्ससाठी (टेस्ट, वनडे, टी20आय आणि इतर अधिकृत फॉरमॅट्स) खेळाडूंची निवड करणार आहे.
सध्याच्या निवड समितीतून दोन सदस्यांची जागा रिक्त होणार आहे. या पदांसाठी नवीन निवड केली जाणार आहे. मात्र, मुख्य निवडकर्ते अजीत अगरकर यांना 2026 पर्यंत विस्तार मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन उमेदवाराकडे किमान 7 टेस्ट किंवा 30 फर्स्ट क्लास सामने किंवा 10 वनडे + 20 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच किमान 5 वर्षांपूर्वी खेळातून निवृत्त असणे बंधनकारक आहे.
याआधी आलेल्या वृत्तांनुसार अजीत अगरकर, एस.एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरत यांची समिती तपासणीखाली असल्याचे समजते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बदल घडवले जाण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, एस. शरत यांच्या जागी माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची निवड समितीत एंट्री होऊ शकते. तर शरत यांना ज्युनियर पुरुष निवड समितीचे प्रमुखपद दिले जाऊ शकते.
जुलै 2023 पासून मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजीत अगरकर यांच्या खात्यात अनेक मोठे यश जमा झाले आहे. त्यात 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला अंतिम फेरी गाठणे, 2024 चा टी20 वर्ल्ड कप जिंकणे आणि 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना 2026 पर्यंत पदावरील मुदतवाढ मिळण्याची शक्यता जवळपास पक्की मानली जात आहे.
