बैलपोळा साहित्य खरेदीसाठी गर्दी

सांगोल्यात बैलपोळा साजरा होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगोल्यात रिमझिम पडणाऱ्या पावसात शेतकऱ्यांनी बैलपोळा सणानिमित्ताने बैलांसह जनावरांसाठी वर्षभर लागणारे सुती कासारे , कंडे , म्होरक्या आदी साहित्य खरेदीसाठी साहित्याच्या स्टॉलवर गर्दी केली आहे. जीएसटी , विजेचे वाढलेले दर, कामगारांची वाढीव मजुरी , इतर खर्च वाढल्यामुळे यंदाही जनावरांच्या साहीत्याच्या दारात सरासरी २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.

शुक्रवार , २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा सण  सर्वत्र साजरा होत आहे. या अनुषंगाने बैलांना वर्षभर लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीसाठी सांगोला शहरातील जय भवानी चौकात शेतकऱ्यांनी वाढत्या महागाईचा विचार न करता वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांसह जनावरांसाठी लागणारी वेसन , कंडे  ,म्होरकी , घुंगरूपट्टा , कवड्याची माळ , सुताचे व नायलॉन कासरे , झुली , शेंब्या , कपाळावरचे गोंडे ,चाबूक आदी साहित्य खरेदी करून बैलपोळा सणाच्या तयारीला लागले आहे. बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांसाठी  आनंदाचा दिवस असून , बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.