अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया डिसुझा हे दाम्पत्य दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतं. देशमुख कुटुंबातील बाप्पाचं आगमन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यावर्षी मात्र रितेश-जेनिलीयाच्या मुलांनी, रियान आणि राहील यांनी अनोखी कल्पना साकारत गणेशोत्सव साजरा करून सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
यंदा रियान आणि राहील यांनी रोबोटिक-गेमिंग थीम निवडली. या दोघांनी तब्बल 2-3 महिने आधीपासून बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली होती. त्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीने फूसबॉल गेमिंग सेटअप तयार केला. या सेटअपमध्ये दोन टीम असतात आणि जी टीम जिंकते त्या टीमचा रोबोटिक मोदक बाप्पाच्या चरणी पोहोचतो. असा हा सगळा देखावा घरच्या घरी सजवण्यात आला आहे.
रितेशने हा संपूर्ण प्रवास सांगत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो म्हणाला की, ‘दरवर्षी बाप्पाची मूर्ती कशी घडवायची याचा आम्ही विचार करत असतो. एकदा आम्ही माती वापरली, कधी वर्तमानपत्रं, कधी मेटल वापरलं. पण यावर्षी मी मुलांना सांगितलं, ‘काहीतरी वेगळं करूयात.’ त्यांनी रोबोटिक्स क्लास जॉईन केला होता.
म्हणूनच यंदा त्यांनी रोबोट, बाप्पा आणि फूसबॉल ही थीम ठरवली. तब्बल दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी या तयारीला सुरुवात केली. 22 उंदीर मामा, 2 रोबोटिक मोदक आणि आपले बाप्पा हे सगळं मुलांनी प्रशिक्षकांच्या मदतीने डिझाइन केलं.
जेनिलियाने या व्हिडिओच्या शेवटी म्हटलं, ‘पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना स्वतःहून विचार करू देणं आणि सर्जनशीलतेला चालना देणं ही खरी संस्कारांची परंपरा आहे.’ या व्हिडिओमध्ये फक्त रियान-राहील नव्हे तर अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या मुलांनीही सहभाग घेतला आहे. सर्व मुलांनी मिळून बाप्पाची सजावट केली आहे. हा परिवारिक उपक्रम नेटकऱ्यांच्या मनाला खूप भावला आहे. रितेश देशमुखच्या मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. चाहत्यांनी कमेंट करून सर्वांचं कौतुक केलं आहे.
