यंदाचा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात रंगणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा उन्मेष सृजनरंगाचा युवा महोत्सव सांगोला (Sangola) येथील सांगोला महाविद्यालय येथे दि. ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत रंगणार असल्याची माहिती कुलकुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी दिली.

नृत्य , नाट्य , लोककला ,ललित ,संगीत विभागातील एकूण ३९ कला प्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील जवळपास २००० विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग असणार आहे. या युवा महोत्सवात लावणी , समूह गायन , कातरकाम , मूक अभिनय , प्रश्नमंजुषा (लेखी), वक्तृत्व मराठी , भारूड , काव्यवाचन , भित्तिचित्रण , मेहंदी , भजन , एकांकिका , शास्त्रीय नृत्य , सुगम गायन , वक्तृत्व इंग्रजी , पथनाट्य ,स्थळचित्रण , लोक वाद्यवृंद , जलसा , पोवाडा , कथाकथन , मिमिक्री , व्यंगचित्र , कव्वाली , प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र , शास्त्रीय गायन , रांगोळी , शास्त्रीय तालवाद्य , मातीकाम आणि लोकनृत्याचा स्पर्धा होणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव आयोजनासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार यंदाचा हा २१ वा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंदाला उधाण येत असते . मागील अनेक वर्षांपासून हा युवा महोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत असून यामुळे चांगले कलाकार घडत आहेत. विद्यार्थी विकास विभागाकडून याचे सूक्ष्म नियोजन केले जाते. या युवा महोत्सवात विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे , असे आवाहन विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले आहे.