इस्लामपुरात शूटिंग खेळाडूंना सुविधांचा अभाव

इस्लामपूर शहरातील शूटिंग खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून कर्तृत्व सिद्ध केले आहे. मात्र या खेळाडूंना आवश्यक आर्थिक मदत, अत्याधुनिक साधनसामग्री आणि योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे येत आहे.

शूटिंगसाठी लागणारी शस्त्रे, गोळ्या तसेच सरावासाठी आवश्यक असलेली रेंज ही अत्यंत महागडी असल्यामुळे खेळाडूंना मोठा खर्च सहन करावा लागतो. सध्या अनेक खेळाडू स्वतःच्या खर्चावर सराव करत असून प्रायोजकत्वाची कमतरता जाणवत आहे. सध्या इस्लामपूर शहरात फक्त १० मीटर रायफल शूटिंगचीच सोय आहे. पण २५ व ५० मीटर फायर आर्म्स सरावासाठी खेळाडूंना आठवड्यातून चारवेळा कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज शूटिंग रेंज, दुधाळी येथे जावे लागते. रायफल शूटिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर अनेक वेळा यश मिळवले आहे. इलेव्हनल वलारिवान या २०२१ पर्यंत १० मीटर एअर रायफलमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल होत्या. जर्मनीत झालेल्या जागतिक मूकबधिर नेमबाजी स्पर्धेत माहित संधू यांनी ५० मीटर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. किरण जाधव आणि ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांनी राष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला. एवढा यशस्वी इतिहास असताना स्थानिक पातळीवर मात्र अजूनही फक्त कागदी घोडेच नाचवले जात आहेत.

या अडचणींवर मात करून वाळवा तालुक्यातील खेळाडूंनी मात्र कर्तृत्व दाखवले आहे. नूकत्याच डेहराडून येथे झालेल्या ऑल इंडिया शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये इस्लामपूरच्या आरुष योगेश गोंदकर याने २५ मीटर स्पोट्र्स पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर विरेन गिरिगोसावी याने ५० मीटरमध्ये राज्यस्तरावर रौप्यपदक पटकावले. हे दोघे आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मात्र शालेय शिक्षणासोबतच कोल्हापूरला प्रवास करून सराव करणे हे या खेळाडूंना खूप कष्टदायी ठरत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन किंवा जिल्हा क्रीडा विभाग काही ठोस मदत करणार का? असा प्रश्न खेळाडू आणि त्यांचे पालकांना सतावत आहे. २५ व ५० मीटर शूटिंग रेंजची सोय आपल्या शहरात लवकर व्हावी, यासाठी क्रीडा संघटनांनी शासनाला याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.