कामेरीत आगीत हार्डवेअर दुकान जळून खाक

ईश्र्वरपूर कामेरी (ता. वाळवा) येथील महामार्गानजीकच्या हार्डवेअर दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही आग शनिवारी रात्री लागली होती.

परिसरातील नागरिकांनी व ईश्वरपूर येथील अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. याप्रकरणी दुकान मालक प्रज्ज्वल प्रकाश मोरे (रा. कामेरी) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

कामेरी येथील ठिबक सिंचन साहित्य, हार्डवेअरचे दुकान आहे. दुकानात रात्री शॉर्टसर्किटने आग लागली. धुराचे लोट बघून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी व अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दुकानातील ठिबक पाईप, नोजल, फिल्टर, व्हॉल्व्ह, ठिबक जोडणी साहित्य, पीव्हीसी पाईप, शेडनेट आदी साहित्य जळून खाक झाले होते.