उपशहर प्रमुखाने शिवबंधन सोडलं, नवा पक्ष ठरला, म्हणाले हा निर्णय…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्ते देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तापडिया नाट्यमंदिर येथे हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. ठाकरे गटासाठी सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी नगरमधून सातत्याने होत जाणारी गळती थांबवण्यात नेत्यांना मात्र अपयश येताना दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भारतीय जनता पक्षाकडून चांगलीच कंबर कसली जात आहे. नेत्यांसोबत भाजपचे कार्यकर्ते देखील सक्रिय झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर भाजप इतर पक्षांच्या नेते-पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. यातूनच आज भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या छत्रपती संभाजीनगर उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास यांना गळाला लावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मिथुन व्यास आज पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे.

उपशहर प्रमुख युवासेना चिटणीस मिथुन व्यास, उपशहर प्रमुख युवा सेना विष्णू क्षीरसागर, उपशहर प्रमुख संजय महागुडे, उपशहर प्रमुख युवासेना योगेश जोशी, उपशहरप्रमुख युवासेना शैलेश सुरडकर, विभाग प्रमुख गुलमंडी आकाश झुंजरकर, शाखाप्रमुख पंकज जयस्वाल, शाखाप्रमुख प्रभात पुरवार, गटप्रमुख अभिषेक डोंगरे, गटप्रमुख अशितोष खंडेलवाल यांच्यासह रोहित अहुजा, केतन सावजी, तुषार दरक, परेश जैन, तुषार चोरडिया, सचिन बंब,निखिल, सचिन अचलिया, शुभम डेंगे, अभिषेक क्षीरसागर, गुड्डू डोंगरे, अंकित सोनी यांच्यासह पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहे.

ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणारे मिथुन व्यास म्हणाले, माझी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर नाराजी नाही. पक्षप्रमुखांनी मला आजपर्यंत काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मात्र स्थानिक राजकारणामुळे मला भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे आज मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहे.