तारदाळच्या वीरपत्नीची अभिमानास्पद कामगिरी

तारदाळ येथील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांनी आपल्या जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले असून या कामगिरीमुळे संपूर्ण तारदाळ गावाचा अभिमान वाढला आहे.

 निलेश खोत सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. २०२२मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीत खचून न जाता प्रियंका यांनी आपल्या पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला.कठोर अभ्यास, शारीरिक प्रशिक्षण आणि अखंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली.

 अखेरीस नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना लेफ्टनंट पदाची गौरवशाली जबाबदारी देण्यात आली. गावात आल्यानंतर प्रथम लेफ्टनंट प्रियंका खोत यांनी ग्रामदैवत श्री शिरकाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला. तसेच त्यांचे स्वागत करीत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर सत्कार प्रसंगी बोलताना प्रियांका खोत म्हणाल्या की, विद्यार्थांनी मोबाईलचा अतिरिक्त वापस टाळून आपल्या परिवाराकडे तसेच स्वतःच्या शिक्षण, करियर कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 या मिरवणुकीवेळी गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक शैक्षणिक, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.