मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांतून लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रवाशाच्या तक्रारीवरुन पाच महिन्यात रेल्वे पोलीस दलातील 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून यात एका वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश आहे.
मुंबईतील ठाणे, पनवेल या प्रमुख् स्थानकातून मेल आणि एक्स्प्रेस लांबच्या प्रवासासाठी सुटतात. ट्रेनमधून मौल्यवान वस्तू जसे की दागिने किंवा रोकड घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना टार्गेट केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले जाते. तेथून सीसीटीव्ही नसलेल्या रुममध्ये नेले जाते. तिथे प्रवाशांना रोख रक्कम, दागिने वा अन्य वस्तू त्यांच्या असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा धाक दाखवत पैसे उकळले जात होते.
जीआरपीच्या निदर्शनास आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. गणवेशधारी वरिष्ठ अधिकारी असतील आणि सीसीटीव्हींची देखरेख असेल तेथेच अधिकाऱ्यांना बॅग तपासण्यास मुभा द्यावी, असं अवाहन जीआरपीने केले आहे. प्रवाशांच्या सामान तपासणीसंबंधी रेल्वे पोलिसांच्या गाइडलाइन्स पोलीस ठाण्यांत तसेच रेल्वे स्थानकांवर ठळकपणे लावल्या पाहिजेत असा सूर प्रवाशांमधून उमटत आहेत.
