इचलकरंजी, महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रारुप प्रभाग रचनेवर मुदतीअखेर २२ हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. दाखल हरकती व सुचनांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महानगरपालिकेच्या पहिल्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल १५ हरकती दाखल झाल्या. त्यामध्ये माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे, प्रधान माळी,शहाजी भोसले, उमाकांत दाभोळे, प्रदीप आवळे, गजानन आंबी, दयानंद माळगे, प्रदीप दरीबे, चंद्रकांत कुडाळकर, स्टीफन आवळे आदींचा समावेश आहे. या सर्व हरकतीवर १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे.
निवडणूकीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती, सुचना दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्यानुसार १२ सप्टेंबरपर्यंत अवघ्या ७ हरकती, सुचना दाखल
झाल्या होत्या. तर सोमवारी अखेरच्या दिवशी आणखी १५ हरकती, सुचना दाखल झाल्या असून आजअखेर दाखल झालेल्या हरकती, सुचनांची संख्या २२ झाली आहे. दाखल हरकती, सुचनांमध्ये ४ सदस्यीय प्रभाग रचनेमुळे विकास कामांवर परिणाम होणार असल्याने एक सदस्यीय प्रभाग रचना करावी, प्रभागाचे पूर्व- पश्चिम बाजूस सीमांकन होणे आवश्यक असून अनेक छोट्या रस्त्यांचे केलेले सीमांकन रद्द करावे, पूरबाधीत क्षेत्रासाठी एक सदस्यीय प्रभाग करावा, प्रभाग रचना दुरुस्त करावी अथवा पुर्वीप्रमाणे ठेवावी प्रभागातील वस्त्यांचे विभाजन करु नये यासह प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवून सदोष प्रभाग रचनेबाबतच्या हरकती, सुचनांचा समोवश आहे. या हरकती, सुचनांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार हरकती, सुचनांवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.
