नीरज चोप्रासोबत फायनलमध्ये धडक मारणारा सचिन यादव आहे तरी कोण ?

भारतासाठी आनंदाची बातमी आहे. टोकियोत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रासोबत भारताचा आणखी एक खेळाडू फायनलमध्ये पोहोचला आहे. तो म्हणजे उत्तर प्रदेशचा तरुण जेव्हलिन थ्रोअर सचिन यादव. सचिन यादव हा भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये एक उदयोन्मुख स्टार म्हणून उदयास आला आहे. टोकियो येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत पात्र ठरणारा तो दिग्गज नीरज चोप्रा याच्यासोबत एकमेव भारतीय आहे. पात्रता फेरीत त्याने ८३.६७ मीटर प्रभावी थ्रो मारत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार अंतिम फेरीसाठी तो आणि चोप्रा तयारी करत असताना, यादवचा एका छोट्या गावापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास मनांना मोहून टाकत आहे.

25 ऑक्टोबर 1999 रोजी उत्तर प्रदेशातील खेकडा गावात जन्मलेला सचिन यादव सुरुवातीला क्रिकेट खेळायचा. पण त्याची ताकद आणि थ्रो करण्याची कला पाहून त्याने अ‍ॅथलेटिक्सकडे वळायचं ठरवलं. तब्बल 1.96 मीटर उंची असलेला सचिन, जेव्हलिन थ्रोमध्ये स्वतःला घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावत आहे. सचिन यादवने या चॅम्पियनशिपच्या क्वालिफिकेशन राउंडमध्ये 83.67 मीटर भाला फेकत फायनलमध्ये धडक मारली. यापूर्वी त्याने आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.16 मीटरचा थ्रो करून सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 84.39 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक पटकावलं होतं. सचिनच्या या ऐतिहासिक प्रवेशामुळे भारताला जेव्हलिन थ्रो फायनलमध्ये दोन खेळाडू उतरवण्याची संधी मिळाली आहे. नीरज चोप्रा आणि सचिन यादव या दोघांकडूनच भारतीय क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत. सचिन यादवचे प्रशिक्षक आणि तज्ज्ञ मानतात की, तांत्रिक बारकाव्यांमध्ये सुधारणा केल्यास त्याचा थ्रो 90 मीटरच्याही पुढे जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात तो भारतासाठी नीरजप्रमाणेच सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.