दादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फासण्याचा प्रयत्न करणारा आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आली असून, 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीची ओळख पटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्याच्या घरी जाऊन तोडफोड केली होती. दरम्यान आरोपीची ओळख पटल्यानंतर आता त्याचा फोटो समोर आला आहे.
बुधवारी सकाळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर वातावरण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळी दाखत परिस्थितीचा आढावा घेतला होता. राज ठाकरेंनी तर पोलिसांना 24 तासात आरोपींचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. यानंतर संध्याकाळी पोलिसांनी उपेंद्र पावसकरला ताब्यात घेतलं.
आरोपी उपेंद्र पावसकर याला आज शिवडी कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असल्याचं कोर्टात सांगितलं. आरोपीने लाल रंग डब्यातून आणला तो डबा तिथेच कुठेतरी फेकला आहे तो आम्हाला शोधायचा आहे असंही पोलिसांनी सांगितलं. आरोपीने हे का केलं? याच्यामागे कोण आहे हे शोधायचे आहे असंही सांगण्यात आलं. आरोपीने वकील केला नसल्याने कोर्टानेच वकील दिला. महिला वकील सुमेधा कोकाटे यांनी वकीलपत्र घेतलं. सुनावणीनंतर कोर्टाने 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
उपेंद्र पावसकर याच्यावर यापूर्वी दादर पोलिस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त 2 ते 3 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. मागील अनेकवर्षांपासून उपेंद्र हा एकटाच राहतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबूल केला असून, त्याच्या जबाबात संपत्ती वादात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप समोर आला आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर व आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रारींसाठी सतत धाव घेणाऱ्या व्यक्तीशी आरोपीचा संबंध असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस अधिक गहन तपास करीत आहेत. आरोपी हा उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे.
