इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय च्या खा. एस. डी. पाटील हॉकी क्रीडांगणावर १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या कोल्हापूर विभागीय हॉकी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मुला मुलींचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इस्लामपूर व डी.सी.नरके विद्यालय कुडित्रे या दोन संघादरम्यान झाला तो सामना विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूरच्या संघाने एक विरुद्ध शून्य गोलने जिंकून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला तसेच दुसरा मुलींचा सामना कोल्हापूर जिल्हा व सातारा जिल्हा या दोन संघादरम्यान झाला तो सामना सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मुधोजी हायस्कूल फलटण या संघाने जिंकला.
मुलांच्या गटात रत्नागिरी जिल्ह्यात तृतीय क्रमांक तसेच मुलींच्या गटामध्ये कोल्हापूर मनपा या संघास तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एल. पाटील, हॉकीच्या राज्य मार्गदर्शिका श्रीमती आरती हळींगळी, संजय पाटील, अॅड. अरविंद पाटील, ताहीर खाटीक, संजय चरापले, संजय चव्हाण, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव अॅड. बी. एस. पाटील व सहसचिव धैर्यशील पाटील यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
