मुंबईतील घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी होणार, MHADA मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. पण मुंबईत घऱांच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचं हे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतं. मुंबईत साधा वन रुम किचन जरी घ्यायचा असेल तर 70 लाखांपर्यंत मोजावे लागतात. यामुळेच जेव्हा म्हाडाची लॉटरी निघत तेव्हा लोक भरभरुन अर्ज करतात. कारण म्हाडाच्या माध्यमातून तरी आपलं घर घेण्याचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. त्यातच आता म्हाडाने सर्वसामान्यांना आणखी एक खूशखबर दिली आहे. म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार आहेत.

सर्वसामान्यांना स्वस्तात घरं मिळावीत आणि म्हाडाचं आर्थिक नुकसानही होणार नाही याचा अभ्यास करण्यासाठी म्हाडाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती घऱांच्या नव्या किंमतीचं सूत्रदेखील ठरवणार आहे. या समितीचा अभ्यास पूर्ण झाला असून, अहवाल तयार करण्यात आला आहे. समिती आता आपला अहवाल म्हाडाच्या उपाध्यक्षांपुढे सादर करणार आहे. पुढच्या आठवड्यात या अहवालाचं सादरीकरण केलं जाईल अशी माहिती आहे. दरम्यान यानंतर मुंबईतील घरांच्या किंमती तब्बल 8 ते 10 टक्क्यांनी कमी होतील असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

सर्वसामान्य नेहमीच म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या खिशाला परडवणारं घर घेता यावं यासाठी म्हाडाच्या लॉटरीकडूनच अपेक्षा ठेवलेल्या असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या घराच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही घरांच्या किंमती तर करोडोत आहेत. यामुळे म्हाडा आपला मूळ हेतू विसरलं आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या किंमतीचा आढावा घेण्यासाठी आणि त्या कमी कशा करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.

या समितीने अखेर आपला अहवाल तयार केला आहे. घरांच्या किमती ठरवताना कोणत्या गोष्टी अंतर्भूत करायच्या आणि कोणत्या नाही याचा अभ्यास समितीकडून करण्यात आला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, सरसकट खर्च न लावता त्या प्रकल्पावर प्रत्यक्षात किती प्रशासकीय खर्च झाला, बांधकाम साहित्याच्या किमतीत किती वाढ झाली, इन्फ्रावर किती खर्च झाला तेवढ्याच रकमेचा घरांच्या किमतीत समावेश केला जावा, अशा निष्कर्षापर्यंत समिती आली आहे.