हातकणंगले, आळते ता. हातकणंगले येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अजित ओमाण्णा कोठावळे (वय ५०) सध्या राहणार शिरोळ रोड आश्रय हॉटेलच्या पाठीमागे जयसिंगपूर ता. शिरोळ (मुळ गाव आळते ) यांनी आळते येथे असलेल्या भावाच्या घरी फॅनला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचे भाऊ दिलीप वामण कोठावळे यांनी हातकणंगले पोलीसांत दिली आहे. ते सोमवारी सुट्टी असल्याने गावी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार अजित ओमाण्णा कोठावळे हे मूळ आळते गावचे असून सध्या राहण्यास ते जयसिंगपूर येथे होते. ते सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून शिरोळ तालुक्यात होते. त्यांची उपकृषी अधिकारी म्हणून पदोन्नती वर सात महिन्या पुर्वी राधानगरी तालुक्यात बदली झाली असल्याचे समजते. ते नेहमी आजारी असत.
या आजारपणाला कंटाळून त्यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आळते येथील मूळ गावी आपले बंधू दिलीप कोठावळे यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिलीप वामण कोठावळे (वय ५५) यांनी हातकणंगले पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.
