तारदाळ, येथील ग्रामदैवत श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचे भव्य स्वागत व आगमन सोहळा सोमवारी सकाळी भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला.
पहाटेपासूनच गावात भक्तांची वर्दळ सुरू झाली होती. सकाळी सात वाजता दसरा चौकातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गाने पालखीची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांच्या वर्षावात व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत गावकरी, पालखीचे मानकरी खोत व चौगुले कुटुंबीय, मंदिराचे गुरव, सेवेकरी, लोकप्रतिनिधी, महिला व बालक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
लेझीम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने आणि वारकरी सांप्रदायिकांच्या अभंग, भजन तसेच भक्ती गीतांनी वातावरण अधिकच मंगलमय झाल्याचे पहावयास मिळाले. मंदिरात पालखीचे पारंपरिक पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
या सोहळ्यास अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, वतनदार पाटील शिवप्रसाद पाटील, गुरुकुमार पाटील यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. श्री शिरकाई देवीच्या चांदीची पालखी मिरवणूक ही तारदाळच्या इतिहासात पहिल्यांदाच सजल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
