मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातील वेगवेगळे शासन आदेश काढले जातील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ओल्या दुष्काळासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे.
“राज्यात मागील काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. 995.5 मिमी पाऊस पडला आहे. धाराशीव येथे रेस्कयू ऑपरेशन सुरु आहे. अतिरिक्त हेलिकॉप्टर आणता येईल का यासाठी माझी बोलणी सुरु आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत एकूण 1829 कोटी जमा झाले आहेत. 2215 कोटी पुढच्या आठ दिवसात जमा होतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. काम थांबलेले नाही. जसे रिपोर्ट येतील तशी मदत करण्याचे काम सुरु आहे. दुर्दैवी घटना असतील त्याला मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असंही फडणवीसांनी सांगितलं. उद्या पालकमंत्री आणि मंत्र्यांना आम्ही त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जायला सांगितले असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
सर्व पद्धतीने मदत
ओल्या दुष्काळासंदर्भात विचारण्यात आलं असता फडणवीसांनी, “जे काही नुकसान झालेले त्याला आम्ही सर्व पद्धतीने मदत करत आहोत. सुरेश धस यांनी पत्र पाठवले असून त्यावर विचार सुरु आहे. केंद्र सरकारने आपल्याला ऍडव्हान्स मदत केलेली आहे. केंद्राची मदत आपल्याला मिळणार आहे. मदतीचे वाटप सुरु झालेले आहे. आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत
शरद पवारांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात केलेल्या मागण्याबद्दल बोलताना फडणवीसांनी, “आपण वेगवेगळी नुकसान भरपाई देतोय. जनावर वाहून गेले तर किती मदत करायची, काही ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी माहिती दिली तर आपण ती मान्य करतोय,” असं सांगितलं. सर्व पालकमंत्री आपआपल्या क्षेत्रात जाऊन आलेत. मदतीचे टप्प्याटप्प्याने जीआर काढले जात आहेत. सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मी स्वतः देखील उद्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे.
