शेतकऱ्यास ऊस तोडणीची माहिती अगोदर देणार

आम्ही ऊस तोडणी कार्यक्रमात अचूकता व सुधारणा करीत आहोत. या गळीत हंगामापासून आपला ऊस कधी तुटणार आहे? याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास त्यांच्या भ्रमणध्वनी (मोबाईल) वर काही दिवस अगोदर देत आहोत, अशी माहिती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी रेठरेहरणाक्ष, दुधारी व बिचूद येथील ऊस उत्पादक सभासद संपर्क दौऱ्यात बोलताना दिली. भर पावसातही शेतकऱ्यांनी या संपर्क दौ-यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा सभासद संपर्क दौरा पार पडला. ज्येष्ठ नेते बी.डी. पवार, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, संचालक दादासाहेब मोरे, सचिव डी. एम. पाटील, जल सिंचन अधिकारी जे. बी. पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रतिक पाटील म्हणाले, पूर्वी साखर कारखाने १६०-१८० दिवस चालत होते. शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी बरीच प्रतिक्षा करावी लागत होती. सध्या ऊस उत्पादनात २० टक्क्यांहून मोठी घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १०० दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता ऊस तोडीसाठी फार प्रतिक्षा करावी लागणार नाही. आपण सर्वांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपल्या साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे.

रेठरेहरणाक्ष येथे जे. डी. मोरे, सुजित मोरे, धनाजी बिरमुळे, उमेश पवार, उपसरपंच विश्वजित पाटील, दिलीप मोरे, जयवंत मोरे, निलेश पवार, संजय मोरे, चंद्रहार पवार, हणमंत मोरे, संदीप जाधव, जयसिंग मोरे, दुधारी येथे आनंदराव लकेसर, सरपंच नागेश कदम, उपसरपंच सागर पाटील, विश्वास पाटील, आनंदराव कदम, जीवन कदम, बिचूद येथे हरीभाऊ सावंत, अशोक पाटील, चंद्रकांत मोहिते, प्रकाश पाटील, दिलीप सावंत, प्रदीप गोडसे, बाजीराव रसाळ यांच्यासह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.