अतिवृष्टी बाधित व पूरग्रस्त नागरिक , विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावेत अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे जलमय झाली, संपूर्ण प्रपंच वाहून गेला, तसेच महत्वाची कागदपत्रे देखील नष्ट झाली आहेत. महापूरग्रस्त नागरिकांना पुनर्वसनाच्या कामाकरिता तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे. परंतु कागदपत्रांच्या अभावामुळे हे नागरिक सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत विशेष कॅम्पचे आयोजन करून नागरिकांना हरवलेली अथवा नष्ट झालेली महत्वाची कागदपत्रे पुन्हा मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे खा . मोहिते पाटील यांनी सांगितले .
