शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज उठवणार

सत्ताधाऱ्यांना राज्यातील समस्यांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. शिक्षकांना अन्य कामात गुंतवणूक ठेवल्याने प्राथमिक शाळेत इतर विषयांबरोबर नम्रता हा विषय शिकवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी आष्टा येथे बोलताना केले.

आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आम. पाटील यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवाज उठविणार असल्याचेही सांगितले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, संभाजीराव कचरे, दिलीपराव वग्यानी, विराज शिंदे, संग्राम जाधव, शिवाजी चोरमुले प्रमुख उपस्थित होते. आ. जयंत पाटील म्हणाले, महायुती शासनाकडे पूरपरिस्थिती, कर्जमाफी, विविध योजनांसाठी पैसा नाही. परंतु यांना शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. तर दुसरीकडे शिक्षकांना नियम व अटी लावून इतर कामे वाढवून त्यांना त्यात गुंतवले आहे. त्यामुळे विद्यादान, विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

आम.पाटील पुढे म्हणाले, शिक्षकांच्या पुढची आव्हाने वाढत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण कोणाची मापे काढेल सांगता येत नाही. मोबाईलमुळे लोकांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना इतर विषय शिकवले. चांगले गुण मिळाले पण त्यांच्याकडे नम्रता नसेल तर भविष्यात त्यांचा काहीच उपयोग नाही. शासन व प्रसार माध्यमांनी याविषयी अभ्यासकरून निर्णय घ्यायला हवा. शिक्षक पात्रता परीक्षा हा शिक्षकांच्या वर अन्याय आहे. सध्याचे सरकार शिक्षण क्षेत्रात कमी गुंतवणूक करत आहे. राज्याची, देशाची प्रगती करायची असेल तर शिक्षकांची साथ असायलाच हवी. सध्याचे सरकार प्रचंड आश्वासने देत असल्यामुळे मूळ कामांसाठी राज्य सरकारला पैसे कमी पडत आहे. जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी दिवंगत राजारामबापू पाटील, विलासराव शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लढा उभा करण्याचा इशारा दिला.

 जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, संभाजी कचरे, दिलीप वग्याणी, अरुणा उपाध्ये आदींनी मनोगतात शिक्षक आणि शाळा, महाविद्यालय यांच्या समोरच्या अडचणी मांडल्या. स्वागत शिवाजी चोरमुले यांनी केले. विराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप तांबवेकर यांनी केले. कार्यक्रमास रघुनाथ जाधव, बबन थोटे, संग्राम फडतरे, विशाल शिंदे, सुनील माने, बाबासो सिद्ध, माणिक शेळके व पदाधिकारी उपस्थित होते. आभार संग्राम जाधव यांनी मानले.