टाटाच्या शेअर्सने 5 दिवसात दिला 35 टक्के परतावा, या 2 कारणांमुळे घेतली उसळी

टाटा समूहाची कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये मागील पाच दिवसांपासून तेजी आहे. शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी या शेअर्सने 12% ची उसळी घेतली. ट्रेडिंग दरम्यान शेअर्सची किंमत 11,847 रुपयांपर्यंत पोहोचली. Tata Investment Corporation शेअर्सचा नवीन उच्चांक आहे. गेल्या पाच दिवसांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 35% चा परतावा दिला आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, Tata Investment Corporation च्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

टाटा कॅपिटल आयपीओ
तज्ञांचे म्हणणे आहे की टाटा कॅपिटलच्या आयपीओ भोवती सकारात्मक भावना असल्याने टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. टाटा कॅपिटलने 26 सप्टेंबर रोजी आयपीओची तारीख जाहीर केली. तेव्हापासून हे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. टाटा कॅपिटलमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा 2.2% हिस्सा आहे. तर टाटा सन्सकडे टाटा इन्व्हेस्टमेंट्सचा 93% हिस्सा आहे

    स्टॉक स्प्लिट घोषणा
    टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्टॉक स्प्लिटची घोषणा. टाटा इन्व्हेस्टमेंट्सने त्यांचे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक शेअर 10 शेअर्समध्ये विभागला जाईल. या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 14 ऑक्टोबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की ते त्यांच्या शेअर्समध्ये तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ते अधिक परवडणारे आणि आकर्षक बनवण्यासाठी स्टॉक स्प्लिट करत आहे.

      टाटा कॅपिटल आयपीओ किंमत पट्टा
      टाटा कॅपिटलचा आयपीओ 6 ऑक्टोबर रोजी बोलीसाठी उघडेल आणि ८ ऑक्टोबर रोजी बंद होईल. आयपीओचा आकार अंदाजे 15,511 कोटी रुपये आहे. कंपनीने प्रति शेअर 310 ते 326 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वरच्या किंमत पट्ट्यावर कंपनीचे मूल्यांकन अंदाजे 1.38 लाख कोटी रुपये असेल.

      शुक्रवारी दुपारी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये तीव्र नफा बुकिंग दिसून आली. परिणामी, शेअर्स घसरला. टाटा इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स घसरून 9,995 रुपयांवर बंद झाले, मात्र २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरने 48% परतावा दिला आहे.