वेदांत भारताला सुवर्णपदक मिळवून देईल-शेट्टी

पट्टणकोडोली,  वेदांत शिरगुप्पे याने राष्ट्रीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढविला आहे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणे म्हणजे केवळ पदक जिंकणे नव्हे तर मानसिक आणि शारीरिक शिस्तीचे उत्तम उदाहरण घालून देणे होय. पॅरा ऑलिम्पिकसाठी वेदांतकडे प्रचंड क्षमता आहे. त्याने आज ज्या ताकदीने कामगिरी केली आहे, त्याच आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केली तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सुवर्णपदक मिळवून देईल.

 वेदांत हा इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरावा यासाठी सर्वांनी त्याला प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले. पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथे वेदांत शिरगुप्पे याच्या सुवर्ण  यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

 नवी दिल्ली येथे २६ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या प्रथम पॅरा राष्ट्रीय सब – ज्युनियर योगासन स्पर्धेत पट्टणकोडोली गावचा वेदांत अनिल शिरगुप्पे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले. सब- सुवर्णपदक पटकाविले. सब – ज्युनियर गटात ३७.५६ गुण मिळवत वेदांतने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचा मान उंचावला.

 या स्पर्धेत देशभरातील १३ राज्यातील ३७ संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. वेदांत हा महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक मिळविणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. इचलकरंजी येथील सौम्या योगा अकॅडमी येथे निलेश कागिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे तर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी या विद्यालयाचा विद्यार्थी असल्याने स्पर्धेसाठी शाळेकडून पाठविण्यात आले होते. वेदांतच्या यशानंतर पट्टणकोडोलीत मिरवणूक काढून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. अण्णाभाऊ साठे स्मारक, श्री विठ्ठल-बिरदेव मंदिर, कल्लेश्वर मंदिर, हनुमान मंदिर अशा प्रमुख स्थळांमधून ही मिरवणूक दिगंबर जैन समाज मंदिरापर्यंत काढण्यात आली. याप्रसंगी माजी खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते वेदांतचा सत्कार करण्यात आला. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष अभयकुमार मगदूम, मुख्याध्यापक सुहास गायकवाड, क्रीडा शिक्षक मुसा शेख, रोटरी क्लबचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.