लहान मुलांनाही लागले मोबाईल गेम्सचे व्यसन

विज्ञान- तंत्रज्ञानातील क्रांतिकारी शोधांमुळे मानवी जीवन सुखी झाले आहे. मात्र त्यातून निर्माण झालेला मोबाईल व समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे तरुण पिढीसह सर्वजण जणू आभासी जगात वावरत आहेत. मोबाईलच्या अतिवापराने सामाजिक संवाद कमी होऊन नवीनच गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. अशा प्रश्नांवर पथनाट्याच्या रूपातून महाविद्यालयीन विद्यार्थिंनी प्रकाश टाकला .

महाविद्यालय परिसरात झालेल्या पथनाट्य कला प्रकारात जिल्हाभरातील ३५ महाविद्यलयाच्या संघाने सहभाग घेतला होता. पथनाट्य स्पर्धेसाठी मोबाईलचे दुष्परिणाम हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघानी मोबाईलच्या दुष्परिणामाकडे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले , मोबाईलमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम या पथनाट्याद्वारे मांडले . तर मोबाईल आणि समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे मानसिक आणि सामाजिक दुष्परिमाण काय होऊ लागले आहे, याबाबतही माहिती दिली. मोबाईलच्या अतिवापराने सामाजिक संवाद कमी होऊ लागला असून प्रत्यक्ष गाठीभेटीऐवजी माणसे मोबाईलवर अवलंबून राहू लागले आहेत. त्यामुळे नातेसंबांधावर नकारात्मक परिणाम होऊ लागले आहेत . त्याचबरोबर सोशल मीडियाच्या अतिवारामुळे आणि मोबाईल गेम्समुळे तरुणांबरोबरच अगदी लहान वयातील मुलांनाही मोबाईलचे व्यसन लागले आहे. या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी मोठया शहरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स काम पाहू लागले आहेत. याच्या दुष्परिणामांची झळ लवकरच ग्रामीण भागालाही जाणवणार असल्याने ग्रामीण तरुणांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.