देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आमने-सामने ? पुण्याच्या रणांगणात दोन्ही दिग्गजांचा सामना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय जनता दरबार घेऊन अजित पवारांनी पक्षविस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुण्यात आज काही पक्षप्रवेश झाले असून पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे चित्र दिसते आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, आमदार, संघटनेतील पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील माजी लोकप्रतिनिधींशी जिल्हानिहाय थेट संवाद साधणार आहेत.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे बिगुल दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता असल्यामुळे भाजपकडून तयारी सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका, नगर पंचायतींमधील निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र भाजपने तयारी पूर्ण केली आहे. भविष्यात होणारे पक्ष प्रवेशांवरही या बैठकांत किंवा खासगीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने या आठवड्यात पाच विभागांसह मुंबईतील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं नियोजन केलं असून प्रत्येक बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहून नेत्यांशी संवाद साधत आहेत. नाशिक व मराठवाड्यासंदर्भातील बैठक नाशिक येथे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची शनिवारी व मुंबई येथे कोकण विभागाची बैठक होईल. भाजप पक्ष संघटनेकडून पूर्ण तयारी केली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणून लढवण्यात येणार असल्याचं महायुतीतील घटकपक्षांच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत असलं, तरी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. पुणे महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत गेल्या निवडणुकीत झाली होती. या निवडणुकीत भाजपने 100 जागा जिंकल्या होत्या. या परिस्थितीत महायुतीतील जागावाटप अडचणीचं असल्याने मुख्यमंत्र्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीत स्वबळावर की महायुती म्हणून लढायचं, याचीही चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे.