इचलकरंजी, वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाईसाठी होत असलेल्या विलंबामुळे कुडचे मळा परिसरातील बाळनगर येथे बेकायदेशीरित्या सुरु असलेला गावठी दारूचा अड्डा भागातील नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्या मदतीने बंद पाडला.
दरम्यान, आमदारांनी दिलेल्या सुचनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून साहित्य जप्त केले. तर पुन्हा हा दारु अड्डा सुरु होता कामा नये, असा इशारा आमदार आवाडे यांनी दिला आहे. याबाबत माहिती अशी, कुडचे मळा येथील बाळनगर याठिकाणी बेकायदेशीररित्या दारु अड्डा सुरु होता. याठिकाणी येणाऱ्या मद्यपींमुळे भागातील नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला नाहक
त्रास होत होता. दारु पिऊन दंगा करणे, निवस्त्र फिरणे अशा प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या संदर्भात भागातील महिलांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनाच सल्ला देऊन परत पाठविण्यात आले. त्यामुळे चार दिवसांपूर्वी भागातील महिलांनी आमदार राहुल
आवाडे यांची भेट घेऊन सदर दारुअड्ड्याबद्दल तक्रार करत तो बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती देत दारु अड्डा बंद करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. पण आमदारांनी केलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
अखेर गुरुवारी दुपारी आमदार राहुल आवाडे यांनी थेट दारुअड्ड्याच्या ठिकाणी धडक दिली. त्यावेळी तेथे खुलेआम दारू विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी भागातील नागरिकांच्या मदतीने अड्ड्यातील साहित्य बाहेर आणून टाकले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा करून साहित्य जप्त केले. यावेळी आमदार आवाडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क
साधत या दारु अड्याबाबत तक्रारी येत असताना कारवाई का केली नाही याची विचारणा करत बेकायदेशीर अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जात आहे का ? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर हा दारु अड्डा पुन्हा सुरु होता कामा नये असा इशारा देताना चुकीच्या कामांना पाठीशी घातल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करू असे सांगितले.
