नेपाळमध्ये अर्थात जेन झी आंदोलकांनी घातलेलं थैमान आणि त्यानंतर या देशात झालेला सत्तापालट संपूर्ण जगानं पाहिला. याची काहीशी झलक भारताच्या लेह लडाखमध्येसुद्धा पाहायला मिळाली. मात्र ही आंदोलनं वेळीच अंशत: शमल्याचीही वस्तूस्थिती समोर आली. आता आणखी एका देशात ‘जेन झी’ आंदोलकांची निदर्शनं गंभीर वळणावर पोहोचली असून, सरकारविरोधातील त्यांची भूमिका अधिक प्रक्षोभक ठरत आहे.
जगभरात आफ्रिकी महाद्वीप अशी ओळख असणाऱ्या मदागास्कर इथं 25 सप्टेंबरपासून Gen-Z Protestची सुरुवात झाली आणि दिवसागणिक हे आंदोलन आणखी गंभीर वळण घेत गेलं. परिणामस्वरुप मदागास्करचे राष्ट्रपती राष्ट्रपति एंड्री राजोएलिना यांना देशातून पलायन करणं भाग पडलं. देशभरात माजलेली अराजकता पाहून राजोएलिना यांनी सरकार बरखास्त करण्याचा निर्णयही घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय फारसा परिणाम करताना दिसला नाही. त्यातच तरुणाईच्या या आंदोलनाला लष्कराचंही समर्थन मिळाल्या कारणानं राष्ट्रपतींना या आंदोलनापुढं हार मानावी लागली.
लष्कर सत्तापालट करु पाहत आहे असा दावा मदागास्करच्या राष्ट्रपतींनी केला होता. तर, देशातील जेन झींनी पाणी आणि विजपुरवठ्यात असणाऱ्या त्रुटी अधोरेखित करत निदर्शनं सुरू ठेवली. याविरोधात हजारोंच्या संख्येनं युवा आंदोलक रस्त्यांवर उतरले. मात्र संरक्षण दलासह त्यांची झटापट झाली आणि या संघर्षात 22 जणांचा मृत्यूही ओढावला. आपल्याला देशात मुलभूत सुविधांसाठीच संघर्ष करावा लागतो असा सूर येथील तरुणाईनं आळवला.
