भाळवणीच्या संजय मोहिते यांची शिवसेनेत एन्ट्री

खानापूरच्या राजकारणात आ. सुहास बाबर यांनी आज मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे. तालुक्यातील पाटील गटाचे एकमेव माजी पंचायत समिती सदस्य संजयकुमार मोहिते यांनी आज मुंबई येथे त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. या राजकीय उलथापालथीमुळे पाटील गटाला मोठा हादरा बसला आहे.

या प्रवेशावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर उपस्थित होते. मोहिते यांच्या शिवसेना प्रवेशाने पाटील गटाला तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे भाळवणी गटातील राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत. मागील पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील भाळवणी गणातून माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची संजयकुमार मोहिते यांच्या रूपाने एकमेव जागा निवडून आली होती.

मोहिते यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून पाटील गटाला मोठा धक्का दिला आहे. युवक नेते अमोल बाबर हे मोहिते व त्यांच्या समर्थकांच्या संपर्कात होते. त्यांनी अत्यंत यशस्वी शिष्टाई करत ही जबरदस्त राजकीय खेळी केली.आमदार सुहासभैय्या बाबर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपण विरोधात असून देखील त्यांनी जे काम केले ते खरोखरच तालुक्याच्या विकासात योगदान देणारे आहे. आपल्या परिसराचा कायापालट खऱ्या अर्थाने करायचा असेल तर आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली काम करणे योग्य ठरेल. त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय आम्ही आज घेत आहोत.अशा प्रतिक्रिया मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली.