अतिवृष्टीमुळे नुकसान ; तालुक्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण : दीपाली जाधव

सांगोला तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. अनेक गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जीवितहानीसोबतच शेतकऱ्यांच्या फळ पिकांसह खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झाले होते. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. या नुकसानीबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून तालुक्यातील सर्वच मंडल चा समावेश करून नुकसानग्रस्त भागाचे अर्थात ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तर उर्वरित पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली आहे.

तालुक्यात मागील काही आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माण नदी , कोरडा नदी आणि अप्रुका नदी दुथडी भरून वाहू लागले आहेत. तसेच सांगोला तालुक्यातील चिंचोली तलाव भरून ओव्हर फ्लो झाला आहे. दरम्यान अनेक रस्त्यावरून पाणी वाहत होते. अनेक रस्ते वाहून गेले आहेत. महूद येथील कासाळ ओढा , वाणीचिंचाळे तलाव तुडुंब भरून पाण्याने वाहत आहे. तसेच गाव ओढ्याला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नद्या नाले तुडुंब भरले होते. शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचून राहिले तर शेती पिके पाण्यातून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तालुक्यात सर्वदूर पावसाचा हाहाकार सुरु होता, काही गावात ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. पावसाने दमदार हजेरी लावत पाणीच पाणी करून सोडले होते . पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले होते. अनेक गावांना पावसाचा मोठा तडाखा बसला होता. शेती पाण्याखाली बुडाली होती. दरम्यान सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त भागांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रशासकीय यंत्रणे कडून पंचनामे करण्यात आले असून तालुक्यातील ५०हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत उर्वरित पंचनामे करण्यासाठी यंत्रणा काम करत असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचेही तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितले आहे.