इचलकरंजी,शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून ही निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात केवळ इचलकरंजी समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर पूर्वीची समिती बरखास्त झाली होती. त्यामुळे नवीन समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्दी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केलेल्या आदेशात इचलकरंजी शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी महेश बसगोंडा पाटील यांची निवडकेल्याचे म्हटले आहे. या निवडीबद्दल महेश पाटील यांचा माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते फेटा व पुष्पगुच्छ | देऊन सत्कार करण्यात आला.
महेश पाटील हे प्रदीर्घ काळापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी चंदूरचे सरपंच, हातकणंगले तालुका पंचायत समितीचे सभापती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते मागील संगांयो समितीत सदस्य होते. या काळात त्यांनी अनेक पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आता ते अध्यक्ष बनले असून कोणीही निराधार पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही व अनुदानात वाढ होण्यासाठी आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.
