दिवाळी स्टॉल लावण्यावरून विक्रेते – महापालिका प्रशासनात संघर्ष

काही काळ तणावाचे वातावरण; विक्रेत्यांनी अखेर रस्त्यावर स्टॉल मांडलेच
इचलकरंजी,  गांधी पुतळा ते शिवतीर्थ या मुख्य रोडवर दिवाळी स्टॉल लावण्यास सकाळी महापालिका प्रशासनाने जोरदार विरोध केला. त्यामुळे छोट्या विक्रेत्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करीत मलाबादे चौकात ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी महापालिका प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रसंगी घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रसंग पहाता यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

दिवाळी बाजार रस्त्यावर भरवू नये याबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने काही निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी महापालिका व पोलीस प्रशासनाने विक्रेत्यांना केले. त्यानंतर विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्याचा ताबा घेवून स्टॉल लावण्यास सुरुवात केली. बघता बघता प्रतिबंधित मार्गावर पुन्हा दिवाळी बाजाराचे स्टॉल लागले. 

रस्त्याच्या मधोमध बाजार भरू नये यासाठी शनिवारी दिवसभर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गस्त घातली. त्यामुळे मार्ग खुला राहिला. मात्र, रविवारी सकाळी महात्मा गांधी पुतळा चौक ते मलाबादे चौक या रस्त्यावर विक्रेत्यांनी कब्जा केला. त्यामुळे पुन्हा महापालिकेने पोलीस बंदोबस्तात मलाबादे चौकातून विक्रेत्यांचे साहित्य दूर करण्यास सुरुवात केली. कारवाईची चाहूल लागताच उर्वरीत विक्रेत्यांनी कांही वेळातच रस्ता खुला केला. पण थोड्या वेळातच सर्व विक्रेते मलाबादे चौकात आले. त्यांनी ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी सुरु केली.

 पोलीस तसेच महापालिकेचे पथक वाहनांच्या ताफ्यासह मलाबादे चौकात आले. त्यांनी विक्रेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विक्रेते व प्रशासन यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली.

 विक्रेते आक्रमक झाल्यामुळे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर विक्रेत्यांनी थोड्याच वेळात पुन्हा रस्त्यावर स्टॉल मांडण्यास सुरुवात केली.बघता बघता पुन्हा मुख्य रस्त्यावर स्टॉल लागले.