इचलकरंजी, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे राजकीय रणांगण सजू लागले आहे. अखेर अपेक्षेप्रमाणे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. या सोडतीकडे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर इच्छुक आपल्या इच्छेप्रमाणे आरक्षण पडणार की नाही या चिंतेत आहेत.
महानगरपालिकेतील ६५ प्रभागांसाठी महिला, मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमाती तसेच सर्वसाधारण गट यांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. प्रशासनाच्यावतीने हा कार्यक्रम पारदर्शक पद्धतीने पार पाडला जाणार असून, त्यासाठी महापालिकेच्या सभागृहात आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. या सोडतीदरम्यान संबंधित प्रभागांसाठी आरक्षणाची घोषणा होताच राजकीय समीकरणे उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इचलकरंजीतील विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात संघटनात्मक तयारी सुरू ठेवली होती. काहींनी प्रचाराची प्राथमिक सुरुवातही केली होती. मात्र आता आरक्षण जाहीर होताच अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद, चिंता आणि तणावात बदलला आहे. अनेक प्रभागांमध्ये आरक्षण बदल झाल्यास विद्यमान नगरसेवक किंवा इच्छुकांचे राजकीय गणित कोलमडू शकते.
प्रभाग महिला किंवा अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव झाल्यास काही इच्छुकांना माघार घ्यावी लागू शकते. तर दुसरीकडे काहींसाठी हा सोडत निकाल ‘नशिबाचा तारा’ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय कार्यालयांमध्ये, बैठकींमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या चर्चांचा जोर वाढला आहे.
दरम्यान, नगरसेवकांचे कार्यक्षेत्र, संघटनांचे समर्थन, पक्षातील गटबाजी आणि मतदारसंघातील प्रबळ मतदारगट हे सर्व घटक आता नव्या आरक्षण रचनेनुसार पुन्हा मोजले जातील. प्रशासनाने या सोडतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष प्रारंभ मिळेल.
